सोलापूर - श्री. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची माघी यात्रा 22 ते 23 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. माघी एकादशी दिवशी पंढरपुरात वारकऱ्यांना, भाविकांना प्रवेश बंदी असणार आहे. पोलीस प्रशासनाकडूनही तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. दिंड्या, पालख्या पंढरपुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे, तर पोलीस प्रशासनाकडून तीन स्तरीय नाकाबंदी असणार आहे. आपत्कालीन व्यवस्था मात्र सुरू राहणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
हेही वाचा - सोलापूर पालिकेत सत्ताधारी भाजपविरोधात सर्वपक्षीय एकवटले
पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील व्यक्तीस पंढरपुरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून तीन पोलीस उपाधीक्षक, ९० पोलीस अधिकारी, तर ७०० पोलीस कर्मचारी असा तगडा पोलीस फौजफाटा तयार असणार आहे. त्याचबरोबर, राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात असणार आहे. तर, पोलिसांकडून तीन स्तरावरती नाकाबंदी केली जाणार आहे. यामध्ये जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि शहर स्तर, अशी नाकाबंदी केली जाणार आहे. येणाऱ्या भाविकांना परत जावे लागणार आहे.
मठ, धर्मशाळांमध्ये राहणाऱ्या भाविकांविरुद्ध गुन्हे दाखल होणार
पंढरपूर येथे यात्रा सोहळा होणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान पंढरपूर येथील धर्मशाळा, मठ, लॉजमध्ये भाविक आढळल्यास त्यांच्यावर 188 कलमानुसार गुन्हे दाखल होणार आहे. 21 फेब्रुवारी पर्यंत पंढरपुरातील मठ, धर्मशाळा, लॉज रिकामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. तसेच, विठ्ठल मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद राहणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांसाठी राज्य परिवहन मंडळाची बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा - सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात