सोलापूर - शहरात आयपीएलवर सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अवंती नगरमध्ये असलेल्या पर्ल हाईट्सवर 6 नोव्हेंबरला छापा टाकाला होता. यावेळी दोघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीतून आयपीएल सट्ट्याचे कनेक्शन कर्नाटकानंतर आता नागपुरातही असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी नागपूरवरून तिघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.अमित उर्फ रिंकू गोविंदप्रसाद अग्रवाल, सुनील गंगाशाह शर्मा, आणि राहुल प्रसाद काळे अशी आरोपींची नावे आहेत.
सोलापुरात आयपीएलचा सामना सुरु होण्यापूर्वी टॉस कोणता संघ जिंकेल, यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत होता. तर सामना सुरू झाल्यानंतर 6, 10, 15 आणि 20 ओव्हरपर्यंत किती धावा होतील, यावरही सट्टा चालायचा. पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अवंती नगरात छापा टाकला. या छाप्यात चेतन रामचंद्र वन्नाल आणि विग्नेश नागनाथ गाजूल या आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून सट्ट्याचे कर्नाटक आणि नागपूर कनेक्शन उघड झाले.
दरम्यान आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधून काही जणांना अटक केली होती. तर आता नागपूरमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 53 लाख 15 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा - वाळू माफियांशी हातमिळवणी; कोराडी पोलीस ठाण्याचे चार कर्मचारी निलंबित
हेही वाचा - कोरोना गेला की काय? दिवाळीच्या खरेदीसाठी नागपूरच्या बाजारात तोबा गर्दी