सोलापूर - खुनासह दरोडा, घरफोडी व मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या व आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडून साडे आठ लाखांचा सोन्या- चांदीचा ऐवज हस्तगत केला आहे. सपाल्या ऊर्फ हनमंतू भीमशा शिंदे (वय 40, रा. जामगाव, ता. मोहोळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.संशयीत आरोपीने कामती (बु) पोलिस ठाण्यांतर्गत बेगमपूर, वाघोली व कोरवलीसह औराद, भंडारकवठे (ता. द. सोलापूर) व हडपसर (पुणे) येथे केलेल्या विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
आठ वर्षापासून फरार होता..
खुनासह दरोडा, खुनी हल्ला, खुनाची धमकी देत चोरी, मंदिरातील साहित्य व मोटारसायकल चोरी अशा विविध गुन्ह्यांसह मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेला हा आरोपी मागील आठ वर्षांपासून फरार होता.स्थानिक गुन्हे शाखेने सांगली जिल्ह्यातून अटक केले.
पोलिसांनी वेषांतर करून अटक केले...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,सपाल्या ऊर्फ हनमंतू भीमशा शिंदे हा सांगलीत नातेवाईकांकडे लपून बसला आहे.पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा लावला होता. एकाने पोलिसांना माहिती दिली की,सपाल्या उर्फ हणमंतू शिंदे हा दवाखान्यात येणार आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय रवींद्र मांजरे,एएसआय ख्वाजा मुजावर यांच्या टीमने पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार वेषांतर करून दवाखान्यात सापळा लावला होता. संशयित आरोपी सपाल्या ऊर्फ हनमंतू शिंदे पोलीस आल्याचा संशय आला.त्याने दवाखान्यातुन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.पण पोलिसांनी सर्व बाजूनं घेरा घातल्याने त्याला पळून जाता आले नाही. शेवटी त्याच्या मुसक्या आवळल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमची महत्वाची भूमिका..
स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने सपाल्या ऊर्फ हनमंतू भीमशा शिंदे यास पकडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील,एपीआय रवींद्र मांजरे,एएसआय ख्वाजा मुजावर,नारायण गोलेकर,धनाजी गाडे,मोहन मनसावाले,धनराज गायकवाड,अक्षय दळवी,समीर शेख,मंजुळा धोत्रे आदींनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.