सोलापूर - घरमालक हुर्डापार्टी बाहेर असल्याचे पाहून घर बंद असल्याने चोरट्याने 20 तोळे सोने आणि 2 लाख 21 हजारांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा ही घटना शहरातील साई सत्यम अपार्टमेंटमध्ये घडली. या चोरीत एकूण 6 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. तर याप्रकरणी अजय सिंदगी (वय-48, रा. सत्यम हाईट्स, बलिदान चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरातील लोक गेले होते हुरडा पार्टीला -
अजय सिंदगी यांचे मार्केट यार्डात भुसार मालाचे दुकान आहे. ते आपल्या मुलासोबत दुकानाला गेले आणि घरातील इतर सदस्य हुरडा खाण्यासाठी शेतात गेले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी गेले आणि जेवण करून पून्हा दुकानात गेले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अजय यांचा मुलगा घरी गेला असता घरफोडी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने लगेच अजय सिंदगी यांना ही माहिती कळविली.
हेही वाचा - शासन केवळ परिचारिकांवर गुन्हे दाखल करून डॉक्टर्सना वाचवण्याच्या प्रयत्नात - खासदार मेंढे
या वस्तूंचा समावेश -
या चोरीत सोन्याचे चार गांठण, सोन्याचे लॉकेट, सोन्याची अंगठी आणि 2 लाख 21 हजाराची रोकड, असा समावेश आहे.
श्वानपथकाला पाचारण -
अजय सिंदगी यांनी याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याला घरफोडीची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बोटांचे ठसे घेतले. पंचनामा केला. तसेच घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करून तपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वानपथक काही अंतरावर जाऊन श्वान पथक घुठमळले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.