सोलापूर - करमाळा तालुक्यातील रावगाव आणि कोर्टी या गावात स्वखर्चाने चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिलीप शेरे असे या तरुणाचे नाव आहे. त्याने स्वखर्चाने जवळपास दीड हजार जनावरांना चारा पाणी देण्याचे काम सुरू केले आहे. २०१२-१३ मध्ये दिलीप शेरे यांच्या भावावर चारा छावणीमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून गुन्हा दाखल झाला होता. त्याच शेरे यांच्या बंधूनी स्वखर्चाने छावणी सुरू केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात दुष्काळाचे चटके बसत असताना देखील सरकारकडून चारा छावणी सुरू करायला चालढकल होत होती. अनेक नियम आणि अटी घातल्यामुळे चारा छावणी सुरू करणे मोठे कठीण काम होऊन बसले होते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांना तत्काळ चारा आणि पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दिलीप शेरे या तरुणाने स्वखर्चाने चारा छावणी सुरू केली आहे.
२०१२-१३ मध्ये दिलीप यांचे भाऊ आप्पा शेरे यांच्यावर चारा छावणीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्यांच्याविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, माझ्या भावावर खोटा आरोप घेऊन त्याला या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गुंतविण्यात आले होते, असे दिलीप यांनी सांगितले.
दिलीप शेरे यांनी मोठ्या जिद्दीने चारा छावणीमध्ये जनावरे संभाळण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज १५ किलो चारा आणि पाणी तसेच जनावरांना सावलीची देखील सोय चारा छावणीवर केली आहे. सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय सुरू असलेल्या चारा छावणीमुळे परिसरातील जनावरांना मोठा फायदा झाला असल्याचे पशुपालक सांगत आहेत.