पंढरपूर - शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात तब्बल ६१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४०० च्या वर गेली आहे.
सुरुवातीला कोरोनाचा प्रादुर्भाव पंढरपूर शहरांपूरताच मर्यादित होता. मात्र, रोजच इथं रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बाहेरील ठिकाणाहून ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांची संख्या अधिक असल्यामुळे शहरासोबत ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतोय. सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 420 वर गेली आहे. त्यातील 263 जणावर उपचार सुरु आहेत तर 140 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात दोघा जणांचा मुत्यू ही झाला आहे. आज कोरोना ग्रस्तामध्ये 209 जण शहरी भागातील तर 90 जण ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.
शहरातील प्रदक्षिणा रोड या भागात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा भाग कोरोनाचा हॉटपॉट बनला आहे. तब्बल ५७ कोरोनाबाधित या भागात आढळून आले आहेत. तसेच नाथ चौक, घोंगडे गल्ली, गांधी रोड, पश्चिमव्दार, तांबडा मारुती चौकामध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन परस्पर समन्वय राखून काम करत आहे. नागरिकांनी गरज असेल तेव्हाच बाहेर पडावे, बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी, सुरक्षित अंतर ठेवून इतरांशी संपर्क करावा, असे आवाहन प्रांत अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार वैशाल वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी केले आहे.