पंढरपूर - माढा तालुक्यातील परितेवाडी येथे 24 डिसेंबर रोजी बावीस वर्षांच्या तरुणाची तीक्ष हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या या तरुणाचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृत तरुणाच्या आईला ताब्यात घेतले असून, प्रियकर फरार झाला आहे. माढा न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी प्रियकर फरार
मुक्ताबाई सुभाष जाधव असे या आरोपी आईचे नाव आहे. तर तात्यासाहेब कदम असे या फरार प्रियकराचे नाव आहे. या दोघांनी मिळून अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने, सिद्धेश्वर सुभाष जाधव याची हत्या करून त्याचा मृतदेह परितेवाडी हद्दीतल्या माळरानावर टाकला होता. पोलिसांसमोर आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन होते. मात्र पोलिसांना आईवर संशय आल्याने त्यांनी या तरुणाच्या आईची चौकशी केली आणि या चौकशीदरम्यान तीने हत्येची कबुली दिली.
माळावर आढळला सिद्धेश्वरचा मृतदेह
24 डिसेंबर रोजी परितेवाडी शिवारातील चारीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तीक्ष हत्याराने त्याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. व हा मृतदेह परितेवाडी शिवारातील माळावर टाकण्यात आला होता. गावातील काही तरुण माळावर असलेल्या चारीत गेले असता, तिथे त्यांना या तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणांनी गावच्या पोलीस पाटलांना याबाबत माहिती दिली. पोलीस पाटलांनी याबाबत चौकशी केली असता, हा मृतदेह सिद्धेश्वर जाधव याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलीस पाटलांनी याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुप्त माहितीच्या आधारे प्रकरणाचा छडा
पोलिसांनी याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली. चैकशीदरम्यान पोलिसांनी मृत सिद्धेश्वरचा लहान भाऊ बालाजी याच्याकडून माहिती घेतली. तेव्हा मुक्ताबाईचे शेजारच्या तात्या कदम याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याला सिद्धेश्वर विरोध करत होता, तसेच तात्या कदम याला जमीन लिहून द्यायला देखील त्याचा विरोध होता. त्यामुळे आईनेच त्याची हत्या केली असावी असा संशय बालाजीने व्यक्त केला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्ताबाईची चौकशी केली. या चौकशीतून हत्येचे प्रकरण समोर आले आहे. दरम्यान तात्या कदम फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सिद्धेश्वर जाधव हा अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा
या घटनेतील आरोपी मुक्ताबाई जाधव व तात्या कदम हे शेतात शेजारी राहत होते. पाच-सहा वर्षांपासून तात्या कदम आणि मुक्ताबाईमध्ये अनैतिक संबंधाला सुरूवात झाली. आरोपीने आपल्या बायको मुलांना देखील घरातून काढून दिले होते. दोन वर्षांपूर्वी मुक्ताबाईचा पती सुभाष जाधव हा अचानक गायब झाला आहे. तसेच मुक्ताबाईची एक एकर जमीन कदम याने लिहून घेतली असून, एका वर्षापूर्वी मुक्ताबाईला रानात पत्र्याचे शेड उभारून त्यामध्ये त्याने ठेवले होते. याला सिद्धेशचा विरोध होता आणि यातूनच त्याची हत्या करण्यात आली.