माढा (सोलापूर) - सध्याच्या मतलबी युगात प्रामाणिकपणाचे दर्शन क्वचितच पहायला मिळते. माढ्यातील सागर पवार या तरुणाने रस्त्यावर सापडलेले रोख रक्कमचे पैशाचे पाकिट व दोन एटीएम कार्डसह महत्वाची कागदपत्रे परत केली. राहुल मुकणे (रा.निमगाव ता.माढा) यास हे कागदपत्रे परत केले.
सागर पवार हा तरुण छत्रपती शिवाजी महाराज नगरकडे जात होता. घराकडे जात असताना त्याला रस्त्यावर पैशाचे पाकीट व एटीएम कार्ड पडलेले दिसले. त्यानंतर आधारकार्ड वरील नाव वाचुन राहुल मुकणे यांच्याशी त्याने संपर्क साधला. पाकिटात ५ हजार रोख रक्कमेसह दोन एटीएम कार्ड होते. शिवाय त्या एटीएम कार्डचा कोड देखील पाकिटात लिहिलेला होता. तसेच आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना यासह अन्य महत्वाची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. रोख ५ हजार रुपये तसेच दोन्ही एटीएम कार्ड मध्ये ३५ हजार रुपये असल्याचे राहुल मुकणे यांनी बोलताना सांगितले. सागर पवारने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल राहुल मुकणे याने सागरचा सन्मान केला. तसेच समाजातुन त्यांचे कौतुक होत आहे.