पंढरपूर - दिवाळी पाडव्यापासून पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. मात्र विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व वारकरी सेनेच्या वतीने पंढरपूरमध्ये आंदोलन केले होते. त्या आंदोलनामुळे विठ्ठल मंदिर वारकरी व भक्तांसाठी खुले झाल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला.
या निमित्ताने बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उद्या पंढरपूरमध्ये येणार असल्याची माहिती वारकरी सेनेचे अरुण महाराज व प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. वंचित बहुजन आघाडी व वारकरी सेना यांच्याकडून ठाकरे सरकारचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुले केल्याबद्दल अभिनंदन केले. वंचित बहुजन आघाडी व वारकरी सेनेच्या वतीने पंढरपूर येथे सप्टेंबर महिन्यामध्ये विठ्ठल मंदिर वारकरी व भक्तांना दर्शन करावे, या मागणीसाठी शिवाजी चौकामध्ये जोरदार आंदोलन केले होते.
त्या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकर यांना विठ्ठल मंदिर कोरोना महामारीवरील सर्व उपाययोजना करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी प्रकाश आंबेडकरांसह आठ जणांना दर्शनाची संधी दिली होती.
महाराष्ट्रातील सर्व मंदिर मशीद व सर्व धार्मिक स्थळे सुरू होणार असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरा जवळ व पंढरपूर येथील नामदेव पायरी जवळ जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद दादा चंदनशिवे, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम, शहराध्यक्ष गणेश भाऊ पुजारी, कोषाध्यक्ष बबन शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला सदस्या अंजनाताई गायकवाड, रवी थोरात, शिवाजी आप्पा बनसोडे, सुहास सावंत, भीमा मस्के, करण वाढवे, बाबा गायकवाड, सुरज मस्के, सुजाता वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते