माढा (सोलापूर) - माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी गावच्या शिवारात भरदुपारी दरोड्याची घटना घडली आहे. वकिलास मारहाण करुन अनोळख्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा २ लाख ९४ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना बुद्रुकवाडी गावच्या बसस्टॉपच्या अलीकडे दोन कि.मी अंतरावर मंगळवारी (दि.3ऑगस्ट) दुपारी २.१५ च्या सुमारास घडली.
योगेश रामदास कापरे (रा.आबेगाव पठार, ता.हवेली, जि. पुणे) यांनी माढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चौघांविरोधात दरोड्याची गुन्हा नोंद झाला आहे.
याबात सविस्तर वृत्त असे की, अॅड. योगेश कापरे हे त्यांच्या चारचाकी वाहनाने नरखेडहून मानेगावकडे जात होते. त्यावेळी बुद्रुकवाडी गावाजवळ रस्त्यावर एक वृद्ध व्यक्त व्यक्ती उभी होती. कापरे यांनी वाहनाचे हॉर्न वाजवून त्यांना बाजूला जाण्याचा इशारा केला. मात्र, ती व्यक्ती रस्त्यावरुन हटली नाही. त्यामुळे त्यांनी आपली चारचाकी थाबंवून खाली उतरले. त्याचवेळी झाडाच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या दोघांनी व दुचाकीवरुन (एम एच २५ ए टी ६८५४) आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करत धमकी दिली. त्यानंतर कापरे यांच्याकडील ८७ हजार ५०० किंमतीच्या तीन अंगठ्या, १ लाख ३० हजार रोख रक्कम, ७ हजार किंमतीचा मोबाईल व दोन तोळ्याची सोन्याची चैन चोरून चौघेही पसार झाले. भर दुपारी झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. माढा पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत.
हेही वाचा - सावळ्या विठुरायाच्या चरणी एक कोटीचे 'गुप्तदान'