पंढरपूर(सोलापूर) - श्री संत दामाजी सहकारी कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम आणि मागील हंगामातील बिलातील ७४ रुपयांची थकबाकी दिलेली नाही. या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखाना स्थळावर आंदोलन सुरू करण्यात आले होते. मात्र, २० डिसेंबरला या आंदोलकांना दोन अज्ञातांनी तलवारीचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दामाजी साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकून तब्बल चार तास कारखाना बंद पाडला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण गेल्यानंतर कारखान्याने लेखी आश्वासन दिल्याने स्वाभिमानीने आंदोलन स्थगित केले आहे.
कारखान्यातील अधिकाऱ्यांची चर्चेनंतर तोडगा
आंदोलकांनी कारखान्याच्या गव्हाणीत उडी मारून कारखाना बंद पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर कारखान्याच्या संंबधित पदाधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेतली. मात्र,त्यात निर्णय न झाल्याने हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात गेेले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत साखर संचालकांना या कारखान्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी साखर संचालकांनी कारवाईचे पत्र दामाजी कारखाना प्रशासनाला दिल्यानंतर कारखाना प्रशासनाने तत्काळ बैठक बोलावून एफआरीप आणि थकबाकी देण्याचे लेखी आश्वासन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांचा साखर सहसंचालक प्रस्ताव
दोन दिवसांपूर्वी कार्यकारी संचालकांनी कारखान्याची आर्थिक परिस्थिती, साखरेचे दर, साखर उतारा पाहता एफआरपीची रक्कम व उर्वरित बिल लवकर देण्याबाबत ठेवलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्यावर त्याबाबतचा अहवाल साखर सहसंचालकांकडे पाठवण्यात आला आहे.