पंढरपूर - राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. आता या मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा दावा केला आहे. कारण 2009 साली दिवंगत आमदार भालके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, व ती जिंकली होती. त्यामुळे या मतदारसंघावर स्वाभिमानीकडून हक्क सांगण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी हा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडावा, अशी मागणी करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल यांनी दिली.
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक स्वाभिमानी पक्ष लढवण्याच्या विचारात-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमधून 2009 साली स्वाभिमानीच्या तिकिटावर दिवंगत आमदार भारत नाना भालके निवडून गेले होते, तर 2014 साली प्रशांत परिचारक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या मतदारसंघावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हक्क आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे मागणार असल्याचे तानाजी बागल यांनी सांगितले.
श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक स्वाभिमानी लढवणार..
श्री विठ्ठल सहकारी कारखान्याची सध्याची परिस्थिती डबघाईला आलेली आहे. त्यामुळे विठ्ठल साखर कारखाना वाचवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येणारी निवडणूक लढणार असल्याचे तानाजी बागल यांनी यावेळी सांगितले. कारखान्याचे सुमारे 75 हजार सभासद असणाऱ्या श्री विठ्ठल कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विठ्ठल कारखान्याची या आधीची निवडणूक लढवली आहे. स्वाभिमानी पक्ष सभासदांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना गावोगावी जाऊन सभासदांच्या मागण्या लक्षात घेणार असल्याचेही बागल म्हणाले.