सोलापूर - विविध गुन्ह्यामधील संशयित आरोपी पोलीस शिपाई मोहद्दीन कोरबू याच्यावर अखेर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी एकाच आठवड्यात 3 पोलिसांवर बडतर्फीची तर 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
2016 मध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी हे वाळु तस्करी प्रकरणी कारवाई करत असताना मोहद्दीन कोरबू याने 4 ते 5 जणांसोबत मिळुन तहसीलदारांना लोखंडी टॉमीने मारहाण करत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच, कारवाई दरम्यान पकडलेल्या वाळूचा ट्रक त्यांच्या जबदरस्तीने पळवून नेला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दरोडा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 2015 मध्ये लाच घेतल्या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
यापूर्वी 2010 मध्ये सदर बझार पोलीस ठाण्यात भा. द.वि.498 (अ) कलमानुसार पत्नीला मारहाण करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, सलगर वस्ती पोलीस ठाण्यात 2020 साली गौण खनिज चोरी केल्याचाही त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. कोरबू हा पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होता. मात्र, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे पाहता अखेर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर बडतर्फीची कारवाई केली. दरम्यान, शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंनी जयप्रकाश कांबळे, किर्तीराज अडगळे यांच्यावर निलंबनाची तर, विकी सुभाष गायकवाड मोहद्दीन कोरबू, स्टीफन स्वामी यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मात्र, पोलीस दलात खळबळ उडाली आहे.