सोलापूर- कोरोना आणि सारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक घराचे आणि घरातील प्रत्येकाचे सर्वेक्षण करण्यासाठी 400 जणांचे पथक तैनात करण्यात आले असून हे पथक आजपासून सर्वेक्षण करणार आहे.
सोलापूर शहरातील सर्वेक्षणासाठी महापालिकेचे शिक्षक तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षक यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास 400 जणांचा सहभाग असून या पथकाच्या माध्यमातून प्रत्येक घराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये घरातील व्यक्ती कोठून प्रवास करून आला आहे का?, घरात कोणाला आजाराची लागण आहे का? किंवा प्रत्येकाचा ताप तपासण्यात येणार आहे.
हे चारशे जणांचे पथक प्रत्येक ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विशेष अशा बसेसची सोय करण्यात आली असून परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून या पथकातील कर्मचाऱ्यांना त्या त्या भागात नेऊन सोडण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जी माहिती जमा होईल त्या माध्यमातून कोरोना तसेच सारी रोगांच्या संदर्भात योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.