सोलापूर - देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सीबीआयला हाताशी धरून नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याच्या धमक्या देत पक्षांतर घडवून आणत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. भविष्यात महाराष्ट्रात कोणतेही सरकार सत्तेत आले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच कॅबिनेट मंत्री असतील, असेही सुळे यांनी सांगितले. त्या सोलापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसताना दिसतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते तसेच विधानसभा पातळीवरील अनेक नेते पक्ष सोडत आहेत. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असली तरीही हेडलाईनमध्ये मात्र कायम आम्हीच आहोत, असे सांगत ज्यांनी पक्ष सोडला त्यांनी कधीही शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत नाराजी किंवा टीका केलेली नसल्याचे सुळे यांनी सांगतले. तर पक्ष सोडून जाणाऱ्यासोबत आमचे कायम कौटुंबीक संबंध असल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले.
देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचा आरोप करत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे कुटुंबीय हे नेमके कुठे आहेत याची कोणतीही माहिती दिली जात नाही, अशा पद्धतीच्या घटना देशात पहिल्यांदाच घडत असल्यामुळे ही अघोषित आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.