पंढरपूर (सोलापूर) - तीर्थक्षेत्र शेगाव मधील 'आनंद सागर' प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवे. हे उद्यान उभे करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माळी यांना दिले.
आनंद सागर सारखे उद्यान उभारणार
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ आहे. दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी. शेगावमध्ये ‘आनंद सागर’ हे सुंदर उद्यान उभारले आहे. पंढरपूरमध्ये असे एक तरी उद्यान असायला हवे. नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.
पुरातन विभागाच्या विषयांवर सविस्तर चर्चा
भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. श्री जोशी यांनी मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी याविषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी दिली. लॉकडाऊनपूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली, याबद्दल श्री जोशी यांनी डॉ गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले. मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.
पालखी मार्गावरील रस्त्यांच्या मुद्दयांवर चर्चा
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. देहू-आळंदी ते वाखरी या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, वाखरी ते पंढरपूर या मार्गाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. वाखरी ते सरगम चौक आणि सरगम चौक ते अर्बन बँक उड्डाण पूल केल्यास वारी काळात वाहतुकीची कोंडी होणार नाही. या कामाबाबत केंद्रीय परिवहन मंत्री श्री.गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन कामाला मंजुरी व निधीची उपलब्धता व्हावी, अशी विनंती श्री.ढोले यांनी केली. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी याबाबत लवकरच नितीन गडकरी यांचेकडे बैठक लावून कामाचा पाठपुरावा करु, असेही सांगितले.
पंढरपुरातील विकासकामांचा नीलम गोरेंकडून आढावा
पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माळी यांनी चंद्रभागा नदीत जाणारे ड्रेनेजचे पाणी बंद केले असल्याचे स्पष्ट केले. प्रदक्षिणा मार्गाचे काँक्रिटिकरण करणे, नामसंकीर्तन कामासाठी निधीची उपलब्धता, प्रदक्षिणा मार्ग आदी विषय उपस्थित केले. यावर डॉ गोऱ्हे यांनी यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. पत्रकार उंबरे यांनी प्रदक्षिणा मार्गाचे कॉक्रीटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रलंबित प्रश्न, दर्शन रांगेचा अर्धवट स्कायवॉक, सार्वजनिक शौचालय, चंद्रभागा नदीतीरावरील घाट, शहरातील रस्ते आदी कामांकडे डॉ.गोऱ्हे यांकडे लक्ष वेधले. वरील सर्व मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पंढरपूर दौरा करणार असल्याचे सांगितले. यावेळी चर्चा झालेल्या कामांचा आढावा व पाहणी या दौऱ्यात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा - आमदार गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना मैदानात येण्याचं खुले आव्हान