सोलापूर - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी एक अभिनव घोषणा केली आहे. या संकल्पनेत २ वर्ष झाड जगविणाऱ्यांना प्रति झाडामागे २०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली आहे.
बार्शी तालुक्यातील इर्ले, यावली, सुर्डी व मालवंडी या गावात पाणी फाऊंडेशनमार्फत चालू असलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या कामाची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतीच पाहणी केली. त्यावेळी त्यांनी श्रमदान करून गावकऱ्यांशी संवाद साधला. पाणी फाऊंडेशनमार्फत जलक्रांतीसाठी मोठी चळवळ उभी झाली आहे. ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी असून अशा विधायक कामातून पुढे पाण्यासाठी होणारे युद्ध आपण थांबवू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी सुर्डी ग्रामस्थांना कामासाठी स्वतः २१ हजारांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच भविष्यात वृक्षलागवडीचे ध्येय निश्चित करा, असे आवाहन केले. प्रत्येक झाडासाठी प्रति झाड २०० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देऊन सोलापूर सोशल फाऊंडेशनकडून सहकार्य करू, अशी हमीही सुभाष देशमुख यांनी यावेळी दिली.
दुष्काळावर चर्चा न करता त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून कामाला लागू. शासन आपल्या स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार आहे , असे सांगून सहकारमंत्र्यांनी यावेळी गावकरी, महिला-भगिनी व मुलांशी आपुलकीने विचारपूस करून चर्चा केली. महिलांमध्ये व्यवस्थापन कौशल्य कमालीचे असते. या चळवळीत महिलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचे सांगत त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच लहान वयात मुलांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सत्कार केले. यावेळी पाऊस चांगला झाला तर आपल्या कामाचे चीज होईल, अशी आशा व्यक्त करून सहकारमंत्र्यांनी गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.