सोलापूर - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जिल्हाबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमेवर आणि जिल्हा सीमेवर सोलापूर शहर पोलीस दल आणि ग्रामीण पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील नागरिकांना सोलापुरात प्रवेश बंदी केली आहे. सोलापुरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची किंवा प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील किंवा वैद्यकीय सेवेसाठी येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे.
नागरिकांवर कारवाई आणि होम क्वारंटाईनचा शिक्का -
विनापरवाना प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. तसेच होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. फक्त वैद्यकीय सेवेसाठी किंवा अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. सोलापूर शहराला लागून असलेल्या हैदराबाद नाका (मुळेगाव), तुळजापूर नाका (लातूर, उस्मानाबाद महामार्ग), पूणे नाका (पुणे महामार्ग), सोरेगाव (विजापूर किंवा कर्नाटक महामार्ग) आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सोलापुरसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शिवाय मृत्यूदरही वाढले आहे. ब्रेक द चैन अंतर्गत शासन विविध स्तरावर उपाययोजना आखत आहे. त्यासाठी ही जिल्हाबंदी लागू केली आहे. सोलापुरातील कोणत्याही व्यक्तीला परजिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याबाहेरील कोणी प्रवेश करत असेल, तर त्या व्यक्तीकडे ई-पास असणे आणि अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण असणे आवश्यक आहे. ग्रामीण पोलीस दलाने सोलापुरातील विविध तालुक्यात 28 ठिकाणी नाकाबंदी केली आहे.