सोलापूर- ऐन खरिपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी संप पुकारला आहे. राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या संपाचा शनिवारी दुसरा दिवस आहे. सोलापूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी काल शुक्रवारी 100 टक्के दुकान बंद ठेवली होती.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची खरिपाच्या पेरणीसाठी लगबग सुरू असताना, खरीपाच्या पेरणीच्या तोंडावरच जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी हा संप पुकारला आहे. कृषी सेवा केंद्र चालक हे फक्त मध्यस्थाची भूमिका बजावत असून कंपनीने तयार केलेले बियाणे पॅकिंग होऊन येत असते. खत देखील पॅकिंग असतो. त्यामुळे बोगस खते व बियाणांमध्ये कृषी सेवा केंद्र चालकांची कोणतीही भूमिका नाही. अनेक ठिकाणी कृषी सेवा केंद्रा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याचा निषेध म्हणून राज्यातील कृषी केंद्र चालकांनी हा तीन दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.