सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे 23 व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद 250 गुणांसह मुंबई विद्यापीठ संघाने पटकावले आहे. तर सर्वसाधारण उपविजेतेपद 170 गुणांसह शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले. सोमवारी पारितोषिक वितरणाने महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवातील मुलांचे सर्वसाधारण विजेतेपद 110 गुणांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादच्या संघाने पटकावले. तर उपविजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. मुलींचे सर्वसाधारण विजेतेपद 160 गुणांसह मुंबई विद्यापीठ, संघाने पटकावले, तर उपविजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले.
हेही वाचा - 'विस्डेन'चा दशकातील सर्वोत्तम टी-२० संघ जाहीर, मोठ्या क्रिकेटपटूंना वगळले
त्याचबरोबर बास्केटबॉल मुलांचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, बास्केटबॉल मुलींचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कबड्डी मुलांचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने तर मुलींचे विजेतेपद एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबईने पटकावले. खो खो मुलांचे विजेतेपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले.
व्हॉलीबॉल मुलांचे विजेतेपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व मुलींचे विजेतेपद मुंबई विद्यापीठ, मुंबईला मिळाले. हँडबाल मुले व मुलींचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास मिळाले आहे. अथलेटिक्स मुलांचे विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास तर मुलींचे विजेतेपद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरला मिळाले आहे. यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा - 'राशिद, आयपीएलमध्ये येताना ती बॅट घेऊन ये!', सनरायजर्स हैदराबादने केले मजेशीर ट्विट
यावेळी कुलपती नियुक्त निरीक्षण समितीचे समन्वयक डॉ. दीपक माने, वित्त समितीचे समन्वयक डॉ. गोविंद कतलाकुटे, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, तज्ज्ञ संचालक डॉ. प्रदीप देशमुख, आंतरराष्ट्रीय हँडबाल खेळाडू श्रेयस मालप, वित्त व लेखाधिकारी श्रेणीक शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक व स्वागत क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी केले.