पंढरपूर - राज्य सरकारला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणे शक्य होते, तरीही त्यांना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले आहे. सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपले आहे, तर सरकारमधील मंत्री क्वॉरंटाईन झाले आहेत. अशी बोचरी टीका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर केली. पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी टीका केली.
खोत म्हणाले, राज्यातील पंधरा हजार ग्रामपंचायतीची मुदत येत्या काळात संपणार आहे. त्या ग्रामपंचायतीवर राज्य सरकार गावातील एका व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करणार आहे, असा आध्यदेश सरकारने काढला आहे. ही बाब लोकशाहीची गळचेपी आहे. तरी राज्य सरकारने तो अध्यादेश रद्द करावा आणि सहकारी संस्थाना ज्या प्रकारे सहा महिन्याची मुदत वाढ दिली आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीला सहा महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी खोत यांनी राज्य सरकारकडे केली.
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. या राज्य सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही, सोयाबीन पिकामधे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे तर कोकणात निसर्गचक्री वादळात शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकारने मुख्य बाजारपेठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा माल शेतात तसाच पडून आहे. तरी या अपयशी राज्य सरकार विरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यात दुधा संदर्भात आंदोलन सर्व सहकारी पक्षासोबत मिळून करणार असल्याचा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या उसाला चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 3100 वरून 3300 प्रति टन दर दिल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे.