पंढरपूर (सोलापूर) - मराठा आरक्षण मागणीसाठी 7 नोव्हेंबरपासून पंढरपूर-अकलूज-बारामती-आकुर्डी-निगडी-मावळ-वाशी या मार्गाने पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील काही भागात संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर शहराच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसचे मार्ग बदलण्यात आले आहे. या काळात पंढरपूर आगारातून एकही एसटी बस बाहेर पडणार नाही, तर राज्यातील दुसऱ्या बसेस पंढरपूरमध्ये येणार नाहीत, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. सेवा बंद ठेवण्यात आल्याने एसटी महामंडळाचे 30 लाखांचे नुकसान होणार आहे. तर पंढरपूर आगाराच्या 250 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती पंढरपूर आगार प्रमुख संतोष सुतार यांनी दिली.
सोलापूरात संचारबंदी
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात 6 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजेपासून 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. ही संचारबंदी महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग याठिकाणी लागू राहणार आहे. नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. पंढरपूर शहरात दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील मोर्चात सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपासून 7 नोव्हेंबरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - सोलापुरात तुरीच्या शेतात पिकवला गांजा, शेतकऱ्याला अटक
आगाराचे मोठे नुकसान
कोरोनाचा प्रसार होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या एस.टी. बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून पंढरपूर आगाराचे कामकाज बंद आहे. दोन महिन्यांत एसटीचे धीम्या गतीने काम सुरू झाले आहे. पंढरपूर येथून आज 80 टक्के एसटी बस फेऱ्या चालू केल्या आहेत. लॉकडाऊन काळात 76 कोटीचे पंढरपूर आगाराचे नुकसान झाल्याचे माहिती सुतार यांनी दिली.
हेही वाचा - राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करून ‘एमएसपी’ अनिवार्य करावी; अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी