सोलापूर - मान्सूनचे आगमन झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पेरणीला सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनचे बियाणे पेरले होते. मात्र, ते पेरलेले बियाणे उगवलेच नाही. उगवण क्षमता नसलेले बियाणे पेरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ नये, यासाठी सोयाबीनचे विकलेले बियाणे कृषी सेवा केंद्राकडून परत घेतले जात आहेत.
जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे. सोयाबीन पिकाला शेतकरी वर्गातून मोठी मागणी आहे. सोयाबीन पिकाखालील वाढत असलेल्या क्षेत्रामुळे बियाण्यांची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे. सोयाबीनची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून महाबीज आणि ग्रीन गोल्ड या दोन कंपन्यांच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाबीज आणि ग्रीन गोल्डच्या सोयाबीन बियाण्याला मागणी असल्याने पुरवठा कमी होत आहे.
महाबीज आणि ग्रीन गोल्ड या कंपन्यांची सोयाबीन बियाणे मिळावे, यासाठी शेतकऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. जिल्ह्यात तर महाबीज आणि गोड्या दोन्ही कंपन्यांची बियाणे उपलब्ध नाहीत. अशावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या काही गावातील शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी येथून ग्रीन गोल्ड आणि महाबीज या कंपनीचे सोयाबीन बियाणे शेतात पेरले. शेतकऱ्यांच्या पसंतीच्या असलेल्या या महाबीज आणि ग्रीन गोल्ड सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर त्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यामुळे तामलवाडी येथील साईराम कृषी सेवा केंद्राच्या मालकाने ग्रीन गोल्ड आणि महाबीज या दोन्ही कंपन्यांचे विकलेले बियाणे परत घ्यायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिकेचे १७८७ कर्मचारी कोरोनाबाधित... ७० जणांचा मृत्यू
तामलवाडी येथील साई राम कृषी सेवा केंद्रातून अनेक शेतकऱ्यांनी महाबीज आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या काही गावांमध्ये या दोन्ही बियाण्यांची पेरल्यानंतर वन झाली नसल्याच्या तक्रारी दुकानदाराकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, हे लक्षात घेता कृषी सेवा केंद्रचालकाने दोन्ही कंपनीच्या व्यवस्थापना सोबत बोलणी केली. बोलणीनंतर शेतकऱ्यांना विकलेले आणि उगवण क्षमता नसलेले सोयाबीनचे बियाणे परत द्यायला कंपनीने सांगितले. यामुळे हे बियाणे परत घेण्यात येत आहे.
दोन्ही नामांकित कंपन्या आहेत. तरी सोयाबीनच्या बियाण्यांच्या क्षमतेबद्दल तक्रार येत असल्यामुळे परिसरात याविषयी चर्चा सुरू झाली. दुकानदाराने दुकानाचे नाव खराब होऊ नये आणि कंपनीलाही या बियाण्याबद्दल सविस्तर माहिती कळावी, यासाठी विक्री केलेले बियाणे परत घेतले. ते कंपनीला परत केले जाणार असल्याचेही कृषी सेवा केंद्र चालक यांनी सांगितले आहे.
सोयाबीनचे बियाणे विक्री केल्यानंतर त्याची पेरणी करण्याच्या अगोदर सोयाबीनच्या काही बिया या माती टाकून त्याची क्षमता तपासून घ्यावी आणि नंतरच पेरणी करण्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे, अशी माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.