सोलापूर - जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढत जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादकांचा ताबा घेतला आहे.अर्निकेम इंडस्ट्रीज (चिंचोली एमआयडीसी, सोलापूर), एल.आर.इंडस्ट्रीज (चिंचोली एमआयडीसी, सोलापूर), एस.एस.बॅग्स व फिल्टर्स (टेम्भुर्णी एमआयडीसी, सोलापूर) अशी ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची नावे आहेत.
शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे. औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन मिळणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ऑक्सिजन कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनाही अधिग्रहित करण्यात आले आहे. अन्य जिल्ह्यात हा पुरवठा विना परवाना केला जाणार नाही. परराज्यात होणारा ऑक्सिजन पुरवठा तात्काळ रोखा, असा आदेश बजावण्यात आला आहे. तसेच ऑक्सिजन दरामध्ये वाढ होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.