पंढरपूर (सोलापूर)- राज्यातील अनेक तुरुंगात कैद्यांना लागण झाली आहे. मंगळवेढा तुरुंगातही कोरोनाने शिरकाव केला आहे. तुरुंगातील तब्बल 28 कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचारी हेदेखील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाची लागण झालेल्या काही कैद्यांना कोरोनासारखी लक्षणे आढळल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. गुरुवारी आलेल्या चाचणी अहवालात त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले.
तुरंग प्रशासनाकडून शुक्रवारी 119 पोलीस तसेच कैद्याची रॅपिड पद्धतीने कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. शनिवारी 119 जणापैंकी 40 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात 28 कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर 12 जणाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दुसरीकडे कैद्यांना डबे देणाऱ्या व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मंगळावेढा पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले. त्यामुळे तालुका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर उपाययोजना करण्याचे चालू आहे.
कैद्यांसाठी कोरोना केेंद्राची स्थापना-
प्रशासनाच्यावतीने कैद्यांसाठी कोरोना केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. तेथून कैदी पळून जाऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. तर निगेटिव्ह आलेल्या 12 कैद्यांसाठी मंगळावेढा तहसील कार्यालयात तुरुंग स्थापन करण्यात आला आहे. त्यांना तिथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा कैदी असलेला भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच या कैद्यांना रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जवळपास सर्वच कैद्यांच्या घशांच्या स्त्रावाचे नमुने घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला कैद्यांची काळजी व त्यांनी पळून जावू नये, याकरता खबरदारी घेताना मोठी कसरत करावी लागत आहे.