सोलापूर - येथील सोलापूर-विजापूर महामार्गावर सीना नदीचे पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर हतुर गावाजवळील वडकबाळ पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी दिली.
उजनी धारणातील पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने भीमा आणि सीना या दोन नद्यांना देखील पूर आला आहे. दोन्ही नद्या सोलापूर शहराच्या 25किमी दूरवरून वाहतात. या नद्यांवरून सोलापूर-विजापूर महामार्ग जातो. गुरुवारी रात्रीपासून सीना नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने हळूहळू पाणी पुलावर येत होते. शुक्रवारी सकाळी भरपूर पाणी वडकबाळ येथील पुलावर आल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष काणे यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक रोखली.
सोलापूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड आणि हलकी वाहतूक होते. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गोवा राज्यातून आलेल्या वाहनांना आणि प्रवाशांना याच महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे या महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. सीना नदीचे पात्र मोठे असल्याने आणि पाण्याची वाहक क्षमताही बलशाली असल्याने कोणतेही वाहन सहजरित्या वाहून जाऊ शकते. म्हणून या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे.
वाहतूक रोखल्याने 10 किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या. अनेक वाहन चालक रस्त्यावरच मुक्काम ठोकून झोपी गेले होते. महामार्गावरील पाण्याची पातळी कमी झाल्यावर वाहने सोडली जातील, अशा सूचना सोलापूर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिल्या होत्या. तसेच ज्यांना विजापुर (कर्नाटक) येथे जावयाचे असल्यास त्यांनी आपला प्रवास रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने जाण्याची व्यवस्था करावी, असे पोलिसांनी सांगितले आहे.