सोलापूर - सोलापूर शहराचे नाव 2016 साली स्मार्ट सिटीच्या योजनेत समाविष्ट करण्यात आले. ज्यावेळी सोलापूरचे नाव स्मार्ट सिटीत समावेश झाले त्यावेळी सोलापुरातील नागरिकांनी पेढे वाटून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पण स्मार्ट सिटीच्या कामात बळी जातील किंवा शहरातील नागरिकांना कंबर किंवा पाठीच्या मणक्यांचे आजार जडले जातील याचा अंदाजा देखील नव्हता. ज्यावेळी प्रत्यक्षात स्मार्ट सिटीचे काम सुरू झाले, तेव्हापासून शहरातील मुख्य रस्त्यावर आणि मुख्य चौकात खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना खड्ड्यातून आपला प्रवास करावा लागत आहे. त्याही पलीकडे म्हणजे स्मार्ट सिटीच्या कामांमुळे काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. 2025 पर्यंत पूर्ण होणारे काम आणखीन किती लोकांचे जीव घेणार? किती वाहनधारकांचे कंबरडे मोडणार? याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाने शहरवासीय हैराण -
2016 साली सोलापूरचे नवीन रुपांतर करण्यासाठी स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक स्मार्ट सिटीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आले. प्रत्यक्षात ज्यावेळी काम सुरू झाले, त्यावेळी सोलापूरकरांवर मोठे संकट उभे राहिल्यासारखे झाले. कारण शहरातून वाहनांवर प्रवास करणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरू लागला. कोरड्या वातावरणात तर शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली. सोलापूर शहराला अनेक नागरिकांनी सोलापूर नव्हे तर धुळे हा शब्द वापरला.
दोन महिन्यात दोन चिमुकल्याचा मृत्यू -
शहरातील उत्तर आणि मध्य विधानसभा मतदारसंघात स्मार्ट सिटीचे काम सुरू आहे. याच भागात शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. येथे नेहमी वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दत्त चौक ते लक्ष्मी मार्केट यादरम्यान स्मार्ट सिटीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. यावेळी समर्थ भास्कर या शाळकरी आणि अल्पवयीन मुलाचा सायकलवरून जाताना खड्डे चुकवत असताना स्मार्ट सिटीचे कामकाज करणाऱ्या ट्रॅक्टरखाली येऊन चिरडून मृत्यू झाला. तसेच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अपूर्वा अलकुंटे या पाच वर्षीय मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामामुळे शहरातील अनेक चौकात विद्युत खांब, विद्युत तारा, इलेक्ट्रीक डीपी उघडे पडले आहेत. वडार गल्ली येथील राहत्या घरासमोर खेळत असताना अपूर्वा अलकुंटेला विजेचा जबर धक्का शॉक लागला होता. यात तिचा मृत्यू झाला.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसते राजकारण -
सोलापूर शहरातील राजकिय पक्ष नुसतेच राजकारण करत आहेत. समर्थ भास्कर आणि अपूर्वा अलकुंटेच्या मृत्यूनंतर महानगरपालिकेत राजकिय पक्षांनी रान पेटवले आहे. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केला. पण स्मार्ट सिटीचे कामकाज 2025 पर्यंत सुरूच राहणार आहे, हे त्या राजकिय नेत्यांना कळून चुकले आहे. सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षाच्या राजकिय नेत्यांनी, नगरसेवकांनी आणि खुद्द महापौर यांनी देखील निदर्शने करत स्मार्ट सिटीच्या कामांचा निषेध केला. वाचा सोलापुरात स्मार्ट सिटीच्या कामाचा सत्ताधारी भाजपाने केला निषेध
केंद्र सरकारच्या पहिल्या टप्प्यात 20 शहरामध्ये सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश -
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या टप्प्यातील 20 शहरांमध्ये सोलापूर शहराचा जानेवारी 2016 साली समावेश करण्यात आला. यासाठी सुमारे 2921 कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. 2025 पर्यंत संपूर्ण सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामागे तत्कालीन महापालिका आयुक्त विजय काळम पाटील यांनी खूप प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - मंगळसूत्र गहाण ठेवून पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या