सोलापूर - महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. रविवारी जिल्ह्यातील शहरी विभागात कोरोनाचे 106 तर ग्रामीण विभागात 12 असे एकूण 118 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तर शहर व ग्रामीण भागाची आकडेवारी पाहिली असता, आतापर्यंत एकूण 3 हजार 219 रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.
गेल्या 3 दिवसांपासून शंभरच्या पुढेच नवे रुग्ण आढळत आहेत. रविवारी सोलापूर ग्रामीण भागात 12 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये 7 पुरुष व 5 स्त्रियांचा समावेश आहे. तर एका 64 वर्षीय पुरुष वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात एकूण 531 रुग्ण झाले आहेत. तर एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात रविवारी 106 नवे रूग्ण आढळले आहे. यामध्ये 63 पुरुष व 43 महिलांचा समावेश आहे. तर 4 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत सोलापूर शहरीविभागात 2 हजार 688 रुग्ण सापडले आहेत. तर 271 रुग्णांचा बळी गेला आहे.
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या महिलेचा अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना आजाराने शहरातील नागरी आणि ग्रामीण वस्तीमध्ये थैमान घातले आहे. तसेच या आजाराविरोधात लढणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याची बाधा होत आहे.