सोलापूर - शहर पोलिसांनी शहरातील तीन संशयित गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर आज ही कारवाई झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
यांच्यावर झाली कारावाई
मुख्य आरोपी संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी आणि त्याचे साथीदार सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड, सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे, अशी या गुन्हेगारांची नावे असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.
टोळी नवीन गुन्हेगारांना करत होते सदस्य
तिघे आपल्या टोळीत नवनवीन गुन्हेगार सदस्य घेत होते. त्यांच्यावर विजापूर नाका पोलिस ठाणे येथे 15 सप्टेंबर, 2020रोजी दरोडा, हाणामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आरोपींना अटकही करण्यात आली होती. यातील टोळी प्रमुख संजय उर्फ लखन गोकुळ परदेशी व त्याचा साथीदार सोनू उर्फ ध्रुव सदाशिव मोरे हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून सोमनाथ उर्फ सोमा सदाशिव गायकवाड हा जामिनावर मुक्त आहे.
जामिनावर बाहेर आलेल्या सोमाला पुन्हा अटक मिळाली 10 दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींनी त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली आहेत. त्यांच्या या कृत्यास पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999च्या कलम 3 (1) (ii), 3 (2), 3 (4) हे कलम वाढ केले आहे. जामिनावर असलेल्या सोमनाथ उर्फ सोमा गायकवाड याचा शोध घेऊन त्याला आणि इतर दोन आरोपींना मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
आरोपींवर आहेत 29 गुन्हे
या तिघांनी सोलापूर शहर आणि परिसरात चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, पोलिसांवर हल्ला करणे, बेकायदेशीरपणे घरात घुसणे, अस्तित्व लपविणे, जनतेच्या संपत्तीचे नुकसान करणे, दहशत माजविणे यांसारखी गुन्हे करत होते. त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 29 गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्ह्यांची दखल न्यायालयाने घेतली आहे.
11 वर्षांनंतर झाली कारवाई
सोलापूर शहरात यापूर्वी 2009 साली मोक्का कायद्यांतर्गत 5 आरोपींवर कारवाई झाली होती. यानंतर 11 वर्षांनंतर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात 7 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी