सोलापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पूरग्रस्तांसाठी सांगली-कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे या बंधूंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाऊन पूरग्रस्तांना 21 लाखांचा मदतनिधी दिल्याने सोलापूरमध्ये शिंदे बंधूंच्या राजकरणाची चर्चा रंगत आहे.
![sanjay shinde meet cm devendra fadanvis](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4157329_a.jpg)
माढ्याच्या शिंदे बंधुंच्या या पावित्र्याने ही विधानसभेची पूर्वतयारी मानली जात आहे. या वरकडीच्या निमित्ताने शिंदे बंधू यांनी शरद पवार यांनाच ठेंगा दाखवल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. याची सुरुवात खुद्द शरद पवार यांनी बारामतीतून केली असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही शिंदे बंधूंना पूरग्रस्तांना करावयाची मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करता आली असती पण त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात पराभूत झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी आता पुन्हा करमाळा मतदारसंघातुन भाजपच्या गोटातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर त्यांचे बंधू बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या मुलाखतींना दांडी मारून माढ्यात कमळ हाती घेण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत, त्यामुळे माढ्याच्या शिंदे बंधू यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला वेग आला आहे.