सोलापूर : संभाजी भिडे समर्थकांनी बुधवारी सोलापूर शहरात संभाजी भिडे यांना पाठिंबा देण्यासाठी कार्यक्रम ठेवले. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी त्यांना कोणतीही परवानगी दिली नव्हती. पोलिसांनी शहरातील शिवाजी चौक परिसरातून भिडे समर्थकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. याबाबत तीव्र संताप व्यक्त करत भिडे समर्थकांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर एकच गोंधळ केला. सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तरी देखील कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांना बळाचा वापर करत जमाावावर सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला.
विनापरवानगी रॅली काढून गोंधळ : संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला संभाजी महाराज चौकात दुग्धाभिषेक करून भिडे समर्थकांनी विना परवाना रॅली काढली. ते बुधवारी सायंकाळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. आम्ही लोकशाही मार्गाने दुग्धाभिषेक करण्यासाठी परवानगी मागितली होती, तरीही परवानगी दिली नाही, असे म्हणणे मांडत पोलिसांसोबत हुज्जत करण्यास सुरुवात केली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यासमोर काही वेळातच विविध हिंदू संघटनांचे जवळपास 200 कार्यकर्ते जमा झाले होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिसांनी लगेच सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगविले.
62 जणांवर गुन्हे दाखल : बुधवारी रात्री उशिरा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात 62 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ओंकार बालाजी चराटे (रा. दमानी नगर सोलापूर), साईप्रसाद अवधूत दोषी (रा, शिवाजी नगर मोदी, सोलापूर), दिनेश मनोज मैनावाले (रा,लोधी गल्ली, लष्कर, सोलापूर), विशाल राजू जाधव (इंदिरा नगर झोपडपट्टी, सत्तर फूट रोड सोलापूर), अभिषेक बसवराज नगराळे (रा,लष्कर सोलापूर), किरण रणजित पगडूवाले (रा, बेडर पूल, लष्कर, सोलापूर), चंद्रकांत शिवशरण नाईकवाडे (रा, निराळे वस्ती सोलापूर), संभाजी उमेश अडगळे (रा, मड्डी वस्ती सोलापूर), प्रेम विश्वनाथ भोगडे (रा, ढोर गल्ली, सोलापूर), अविनाश बाबूसिंग मदनावाले (रा,लष्कर,सोलापूर), नागेश सुभाष येळमेरी (रा,भवानी पेठ, शाहीर वस्ती सोलापूर) व इतर 40 ते 50 जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांविरोधात वरिष्ठांपर्यंत जाणार : भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, भाजपाचे माजी नगरसेवक राजकुमार पाटील, गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांनी सोलापूर शहर पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप नेत्यांनी दावा केला, की लोकशाही मार्गाने भिडे समर्थक दुग्धाभिषेक करत असताना, पोलिसांनी बळजबरीने पकडून पोलीस ठाण्याला आणले होते. त्याबाबत विचारणा करण्यासाठी आलेल्या विविध हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावादेखील करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सहायक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांच्या विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती यावेळी भाजप नेत्यांनी दिली.
हेही वाचा :