सोलापूर : मध्य प्रदेशातील सिंधी जिल्ह्यातील सुमारे 21 बांधकाम मजूर महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील महादेव कांबळे नावाच्या ठेकेदारानं मध्य प्रदेशातून बांधकाम मजूर बांधकामासाठी आणले होते. मात्र, एक महिना उलटूनही त्यांना वेतन मिळालं नाही. शिवाय कामावरून काढून टाकण्यात आलं.
पगार न देता ठेकेदार पळून गेला : माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एका ठेकेदारानं मध्य प्रदेशातून बांधकाम मजूर आणले होते. दीड महिना काम करूनही बांधकाम कामगारांना पगार न देता ठेकेदार पळून गेला. त्यांनी मजुरीची मागणी केली असता, ठेकेदार अरेरावी भाषा बोलत असल्याचे बांधकाम कामगारांनी माध्यमांना सांगितलं.
बांधकाम मजूर जिल्हाधिकारी कार्यालयात : फसवणूक झालेल्या सर्व मजुरांनी न्यायासाठी बुधवार 6 सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गरीब बांधकाम कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या मदतीनं मजुरांचे डोळे पाणावले. बांधकाम मजूर कुटुंबासह सोलापुरात आले असता त्यांच्यासोबत लहान मुलेही होती. या मुलांचा किलबिलाट जिल्हाधिकारी कार्यालयात पहायला मिळाला.
बांधकाम मजुरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली व्यथा : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या सर्व मजुरांची चौकशी करून त्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर हजर केलं. यामध्ये मिथलेश लोणी, रेखा लोणी, भुवनेश्वर लोणी, शिवा लोणी यांच्यासह 21 जणाचा सहभाग होता. संबंधित ठेकेदार गेल्या दीड महिन्यापासून पगार न देताच गायब झाल्याची खंत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडं व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तात्काळ आदेश : बांधकाम कामगारांची व्यथा ऐकून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तत्काळ माढा तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित कंत्राटदाराची माहिती घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितलं. माहिती गोळा करून त्यांना मध्य प्रदेशात पाठवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यास सांगितलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मदत केल्याने सर्व मजुरांनी अभार व्यक्त केले.
हेही वाचा -
- kunbi certificate GR : कुणबी प्रमाणपत्राचा राज्य सरकारनं काढला अध्यादेश, मनोज जरांगे अजूनही उपोषणावर ठाम, कारण...
- Maratha Reservation: मराठवाड्यातील कुणबी दस्तावेज तपासण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर, 48 तासांमध्ये तपशील कळवण्याचे निर्देश
- Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी नोंदणीची तपासणी युद्धपातळीवर; ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या