सोलापूर - भोपाळ येथील आयकर विभागाने 19 फेब्रुवारी 2021 रोजी बेतुल ऑइलमिलवर छापा टाकून कारवाई केली होती. तर 20 फेब्रुवारी 2021ला रात्रीच्या सुमारास बेतुल ऑईल मिलशी संबंधित पाच संशयित पाच आरोपींनी ऑइल मिल मधून कोट्यवधीची रोकड आणि दागिने घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली होती. यावेळी आयकर विभागाने चिंचोळी एमआयडीसी येथे पुन्हा कारवाई करत पाच जणांवर चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या आरोपींनी गुरुवारी (18 मार्च ) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांसमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मनीष राजेंद्र बोथरा (वय 44 ,रा कोंडी,सोलापूर), रामचंद्र भरतरी शिंदे (वय 42 रा,बाळे,सोलापूर) दिलीप कुमार (वय 53 वर्ष,रा बेतुल,मध्य प्रदेश), राम अविश यादव (वय 34,रा नारायणपूर,उत्तर प्रदेश), गणेश दत्तात्रय वाघमोडे(वय 30 वर्ष,रा,मोहोळ,जि सोलापूर) अशी त्या आरोपींची नावे आहेत.
भोपाळ येथील आयकर विभागाने काँग्रेस आमदार निलय डागा यांच्या देशभरातील संपत्तीवर छापा टाकला होता. यामध्ये मुंबई, पुणे, भोपाळ, कोलकातासह सोलापुरातील मालमत्तांचा समावेश होता. आमदार निलय डागा यांची सोलापुरातील पुणे महामार्गावर चिंचोळी एमआयडीसी येथे बेतुल ऑइल मिल आहे. या ठिकाणी कारवाईत आयकर विभागाने कारवाई कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच ही आईल मिलही सील केली होती.
ऑइल मिल मधून मुद्देमाल घेऊन पळून जात होते संशयित
बेतुल ऑइल मिल मधील सर्व बाबींचा व बेहिशोबी मालमत्तेचा तपास करण्यासाठी सील केली होती. त्यावेवी वरील पाच संशयित आरोपींनी सील केलेल्या बेतुल ऑइल मिल मधून 7 कोटी 45 लाख रोख रक्कम आणि 30 कोटी 28 लाख रुपयांचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने घेऊन एका कार मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. ऐनवेळी आयकर विभागाचे अधिकारी पोलिसांसोबत घटनास्थळी पोहोचले आणि सर्व मुद्देमाल जप्त केला.
वेल्डिंग कटरने ग्रील तोडून बेहिशोबी मालमत्ता बाहेर काढली-
आयकर विभागाने बेतुल ऑइल मिल संपूर्ण सील केली होती. पोलिसांचा खडा पहारा तैनात केला होता. त्यावेळी या पाचही संशयित आरोपींनी कंपनीच्या मागील बाजूने आत शिरकाव केला. त्यासाठी त्यांनी वेल्डिंग कटरच्या साहाय्याने आतील बंगल्याचे ग्रील तोडले होते. त्यानंतर बंगल्याती दागिने आणि रोकड घेऊन एका कारमधून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आरोपी कारमध्ये बसून बाहेर पडण्यापूर्वीच आयकर विभागाचे अधिकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंत पोलिसांनी आरोपींना अटक करत मुद्देमाल आयकर विभागाच्या ताब्यात दिला. या प्रकरणात त्या पाच जणांविरोधात आयकर अधिकारी आशिष राय यांनी तालुका पोलीस ठाण्यात चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती.
रक्कम व दागिने जप्त करून स्टेट बँकेत जमा केले-
या प्रकरणात जप्त करण्यात आलेली रक्कम आणि मुद्देमाल आयकर अधिकारी आशिष राय यांनी सोलापुरातील स्टेट बँकेच्या माध्यमातून सरकार जमा केल्या. यामध्ये 7 कोटी 45 लाख रुपये रोकड (500 व 2000 नोटा) आणि 30 कोटी 28 लाख रुपयांचे सोन्याचे, हिऱ्यांचे दागिने याचा समावेश होता. तसेच या आरोपींना सोलापूर तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पुढे आणखी तीन दिवस तपासनी करून आइल मिलमधून महत्वपूर्ण कागदपत्रे आणि विदेशी चलन हस्तगत केले होते.
आरोपींचा जामीन अर्ज दाखल आणि फेटाळला-
तालुका पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मनीष बोथरा, रामचंद्र शिंदे, दिलीप कुमार, राम यादव आणि गणेश वाघमोडे यांनी जामिनासाठी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी वेळी जिल्हा सरकारी वकील अॅड प्रदीपसिंग राजपूत यांनी जोरदार हरकत घेत युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पाचही संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामध्ये आरोपींच्या वतीने अॅड आर.आर.पाटील आणि अॅड अरविंद आंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकार तर्फे अॅड प्रदीपसिंग राजपूत यांनी काम पाहिले.