सोलापूर- युवा चित्रकार सचिन खरात यांनी सामाजिक कार्य़ासाठी 2 लाख रुपयांची मदत केली आहे. सचिन यांनी चित्रांची विक्रीतून आलेली ही रक्कम तामिळनाडूतील कोलम या खेडे गावच्या विकासासाठी वापरली जाणार असल्याचे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
सोलापूरचे युवा चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचे प्रदर्शऩ व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमस निमित्त 25 डिसेंबर रोजी चैन्नई येथील मद्रास क्लब येथे हे चित्रांचे प्रदर्शन भरले होते. या चित्रांच्या प्रदर्शनामध्ये चित्रकार सचिन खरात यांची चित्रे विकली गेली आहेत. त्यांच्या विक्री झालेल्या चित्रांतून आलेल्या एकूण रकमेपैकी 2 लाख रुपये त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान दिले आहेत. चैन्नई रोटरी क्लब यांच्या वतीने चैन्नई जवळील कोलम या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सचिन खरात यांनी दिलेले 2 लाख रिपये वापरले जाणार आहेत. 25 डिसेंबर रोजी चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांचे प्रदर्शन व लाईव्ह कार्यक्रम देखील पार पडला.