पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना राज्य शासनाने 114 कोटी 67 लाख रुपयांचे कर्ज मंजूर होणार आहे. सहा साखर कारखान्यांना राज्य शासनाने थकहमी मंजूर केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे. या मदतीमुळे पंढरपूर, माळशिस, माढा आणि मंगळवेढा येथील सहा साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.
राज्य शासनाने राज्यातील 32 कारखान्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आमदार भालकेंच्या विठ्ठल (30 कोटी 98 लाख), भाजप नेते कल्याणराव काळेंच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे (14 कोटी 52 लाख), धनंजय महाडिक यांच्या भीमा (20 कोटी 22 लाख), शिवसेना नेते समाधान आवताडेंच्या संत दामाजी (10 कोटी 58 लाख), धनाजी साठेंच्या कूर्मदास (5 कोटी 15 लाख) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहकार महर्षीला (33 कोटी 24 लाख) या कारखान्यांना राज्य शासनाने एकूण 114 कोटी 67 लाख रुपयांची हमी दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात दुकानं खुली ठेवण्याच्या वेळेत वाढ; आता रात्री 9 पर्यंत राहणार सुरू
पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखान्याला राज्य शासनाने (2019-20) गाळप हंगामासाठी अनुक्रमे 12 कोटी रुपयांच्या अल्पमुदत कर्जास शासनाने हमी दिली आहे. विठ्ठल कारखान्यांनी शासन हमीवर घेतलेल्या कर्जाची व्याजासह सप्टेंबर 2021 पर्यंत परतफेड करणे आवश्यक आहे. तसेच, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील या साखर कारखान्याला राज्यात सर्वाधिक 33 कोटी 24 लाख रुपयांची हमी मंजूर केली आहे. त्याखालोखाल आमदार भालकेंच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 30 कोटी 98 लाख रुपयांची हमी मंजूर झाली आहे. पंढरपुरातील विठ्ठल, सहकार शिरोमणी, माढा तालुक्यातील कूर्मदास हे साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर होते. कारखान्यांना यावर्षी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे.
राज्य शासनाच्या वित्त आणि सहकार वस्त्रोद्योग विभागाने अध्यादेश काढला आहे. राज्य शासनाने थकहमी दिली असली तरी संबंधित बँकेला कर्ज वसुलीचे अधिकार दिले आहेत. घेतलेल्या कर्ज फेडीसाठी संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळाची सामूहिक जबाबदारीही यामध्ये निश्चित केली आहे.
हेही वाचा - एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर कोल्हापुरात विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव