सोलापूर - पंढरपूर मोहोळ महामार्गावर पेनूरजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन स्त्री व दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
डॉ. आफ्रिन अत्तार(वय 30 वर्ष), डॉ. मुजाहिद अत्तार(वय 32 वर्ष), अरमान अत्तार(वय 5 वर्ष), इरफान खान (वय 40 वर्षे), बेनझिर खान (वय 35 वर्षे) खान दाम्पत्यांची तीन वर्षीय लहान मुलगी, या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. राजेंद्र हुंडेकरी, रामचंद्र शेटे, मंदाकिनी शेटे हे तिघे जखमी झाले आहेत. अपघाततील मृतदेह मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असून जखमींना पंढपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
पंढरपूर मोहोळ या महामार्गावर यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत. खान व अत्तार कुटुंबीय आपल्या चारचाकी (एम एच 13 डी टी 8701) या वाहनांतून पंढरपूरहून मोहोळ (सोलापूर) कडे येत होते. तर शेटे, हुंडेकरी हे सोलापुरातील लग्नकार्य आटोपून सोलापूरहून गादेगाव (ता. पंढरपूर) येथे चारचाकी ( एम एच 13 डी ई 1242) तून जात होते. दोन्ही वाहने पेनूर गावालगत येताच दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
हेही वाचा - Siddharthnagar Road Accident : उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगरमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू