सोलापूर - ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने व प्रथमच भक्तांविना प्रथमच साजरा झाला. नऊशे वर्षांच्या यात्रेला कोरोनाने खंडित केले. यावेळी काही मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा अक्षता सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
भक्तांविना अक्षता सोहळा
सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला सुमारे 900 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेला उपस्थित असतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातून सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पण, प्रशासनाने 12 ते 16 जानेवारी दरम्यान मंदिर परिसरात संचारबंदी लागू केल्याने मंदिरात भाविकांना परवानगी नाकारण्यात आली. प्रशासनाने परवानगी दिलेल्या मानकऱ्यांंनाच या अक्षता सोहळ्यात उपस्थित राहता आले.
नदीध्वज अक्षता सोहळ्यास आले नाही
दरवर्षी अक्षता सोहळ्यास नंदीध्वज 68 लिंगांना तैलाभिषेक करत मिरवणूक मार्गाने संमती कट्ट्यावर दाखल होतात. पण, पोलिसांनी या सर्व विधीवर बंदी घातली होती. मानकऱ्यांनी नंदीध्वजाची मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने जागेवरच पूजा करण्यात आली.
कन्नड भाषेतून मंगलाष्टका
केवळ पालखी व योगदंड संमती कट्ट्यावर अक्षता आले. पालखीचे आगमन झाल्यावर सुगडी पूजन आणि गंगा पूजन करण्यात आले. यानंतर काही वेळातच अक्षता सोहळ्यास सुरुवात झाली. सिद्धेश्वर महाराजांनी रचलेल्या मंगलाष्टका शेटे घराण्यातील सुहास शेटे यांनी म्हटल्या.
संमती कट्ट्याला पोलीस छावणीचे स्वरूप
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने भाविक आणि मानकरी असे एकूण फक्त पन्नास जणांना परवानगी दिली आहे. संमती कट्ट्याजवळ भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे संमती कट्ट्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
हेही वाचा - सोलापुरात हुतात्म्यांच्या पुतळ्यांची दुरावस्था; संभाजी आरमारचा महापालिकेत ठिय्या
हेही वाचा - आता ऑनलाइन पासविना श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे होणार मुखदर्शन