सोलापूर - मागील 55 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेले परराज्यातील मजूर आपापल्या गावाकडे जाण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. रेल्वेने 'श्रमिक विशेष रेल्वे'ची सोय उपलब्ध करून दिली. पण रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. यामुळे अवघ्या चार महिन्यांची बाळंतीण रेल्वे रूळावरूनच पायी चालत निघाली. त्यात विशेष ट्रेन सुटायची वेळ झाली होती. मात्र, गाडी पकडण्यासाठी बाळंतीण वेगात चालत येत असलेलं पाहून रेल्वे प्रशासनाने गाडी चक्क दहा मिनिटे थांबवली.
आज सोलापूरहून ग्वाल्हेरसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आली. पण रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी वाहनाची कुठलीही सुविधा नव्हती. यामुळे एक चार महिन्याची बाळंतीण आपल्या तान्हुल्यासह रेल्वे रुळावरुन चालत निघाली. या महिलेच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी हे पळत-पळत येत होते. हे पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे नियोजित वेळ होऊन आणखी १० मिनिटे जास्त थांबवली.
ती महिला आपल्या चार महिन्यांच्या बाळासह रेल्वेमध्ये चढली आणि त्यानंतर रेल्वे निघाली. हा थरार एका चित्रपटाच्या कथेसारखाच ठरला. दरम्यान, आज सोलापूरवरून ग्वाल्हेरसाठी एकूण 1146 प्रवाशांना घेऊन रेल्वे रवाना झाली. रेल्वेतील प्रवाशांना शिदोरी म्हणून सोलापूरातील लक्ष्मी हायड्रोलिक या कंपनीकडून जेवणाची सुविधा करण्यात आली.
हेही वाचा - सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले, काही भागात वादळी वाऱ्यासह गारा
हेही वाचा - सोलापुरात आणखी 21 जणांना कोरोनाची लागण; आतापर्यंत 364 कोरोनाबाधित, तर 150 जण कोरोनामुक्त