सोलापूर- केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सोलापुरात रान पेटले आहे. शहरात विविध ठिकाणी शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकऱ्यांनी आंदोलन करत नारायण राणेंच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनाला किती वर्ष झाले यावरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवली असतो, असे वक्तव्य केल्याने राज्यभर नारायण राणे विरोधात विविध प्रकारचे आंदोलन होत आहेत.
सोलापुरातील जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पार्क चौक येथे मुख्य रस्त्यावर येऊन नारायण राणे यांचा निषेध केला. जिवंत कोंबड्या आणून कोंबडी चोर अशी टीका सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली.
हेही वाचा-Maharashtra Breaking Live : नारायण राणेंना घेऊन पोलीस महाडच्या दिशेने रवाना
जिवंत कोंबड्या आणून केली नारायण राणेंवर टीका-
जिल्हा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील पार्क चौक येथील मुख्य कार्यालयासमोर नारायण राणेंवर जहरी टीका केली. नारायण राणेंच्या पोस्टरला जोडे मारून पायाखाली तुडवण्यात आले. तसेच युवा सेनेच्या इतर कार्यकर्त्यांनी जिवंत कोंबड्या आणून केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यावेळी गणेश वानकर, गरुषांत धतुरगावकर, श्रवण तात्या, विठ्ठल वानकर, अतुल भवर सह आदी उपस्थित होते.
हेही वाचा-नारायण राणेंना अटक करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला - भाजप प्रवक्ते संबित पात्रा
रास्ता रोखल्याने पोलिसांची एकच तारांबळ
शहरातील मुख्य चौक असलेल्या पार्क चौक येथे युवा सेनेचे कार्यालय आहे. याठिकाणी अचानक मुख्य रस्त्यावर आंदोलन झाल्याने वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. जवळच फौजदार चावडी पोलिस ठाणे आहे. रास्ता रोखो झाल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला केले.
हेही वाचा-राणेंचे विधान महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही - बाळासाहेब थोरात
काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते, की 'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले.