सोलापूर - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आमदार होण्यासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर विद्यमान आमदारांनी मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी जेऊर या गावात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी आमदार नारायण पाटील, सभापती शेखर गाडे, देवानंद बागल, महेश चिवटे, सुनील तळेकर,अर्जुन सरक, राजाभाऊ कदम, अजित विघ्ने, गहिनीनाथ ननवरे, अजित तळेकर, जयप्रकाश बिले, नीलकंठ देशमुख, आदींनी मार्गदर्शन केले.
माझ्या कालावधीत कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत याची पोचपावती नक्कीच मिळेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी ती माहिती गावोगावी पोहोचवावी. तसेच, माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. त्यामुळे जनतेसमोर मला छातीठोकपणे मते मागण्याचा नैतिक अधिकार असल्याचे सांगत आमदार नारायण पाटील यांनी यावेळी विरोधकांवर आपल्या भाषाशैलीत तोफ डागली.