सोलापूर : सोलापुरातील शिवसेना ( शिंदे गट) नेत्यांची प्रशासकीय कामे होत नाहीत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील वेळ देत नाहीत, अशी खदखद सोलापुरातील शिंदे गट शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी व्यक्त केली आहे. भाजपवर नाराजी व्यक्त करत त्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. शिवसेना शिंदे गट नसेल तर काय होईल, याचे भान ठेवा असा इशारा दिला आहे. सोलापूर शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यावेळी म्हणाले की, भाजपाने लक्षात ठेवले पाहिजे की, शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपवाले सत्तेत आले आहेत.
शिवसैनिकांवर अन्याय : माढा लोकसभेमध्ये आम्ही जीवाचे रान केले. आमच्यावरती २५-३० वर्षे झालेला अन्याय डोळ्यासमोर ठेवून आम्ही भाजपाचा खासदार निवडून दिला, परंतु भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे आम्ही ज्यांचा विरोध पत्करून ज्यांची कामे केली, आज भाजपकडून त्यांना ताकद दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून आम्ही शिवसैनिक ( शिंदे गट) अन्याय सहन करत आहोत. आमची कुठलीही कामे होत नाहीत. फक्त भारतीय जनता पार्टीचे काम करा, असा अलिखित आदेश प्रशासनाला दिलेला आहे. तोही आम्ही सहन करत असल्याचे सांगितले.
ज्यांच्यासाठी आम्ही रक्ताचे पाणी केले, तेच इतर लोकांना बरोबर घेऊन फिरणार असाल तर भविष्यामध्ये आमच्या मदतीची अपेक्षा करू नका- संजय कोकाटे
आमच्या मदतीची अपेक्षा करू नये : शिवसेना, मित्र पक्ष येणाऱ्या काळामध्ये भाजपाच्या उमेदवाराचा खासदारकीचा प्रचार करतील, असे मला वाटत नाही. कारण एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आल्यापासून कुठलेही काम शिवसेनेचे किंवा आमचे झालेले नाही. साध्या पत्रासाठी सुद्धा आम्हाला दहा फोन करावे लागतात. पुढे बोलताना संजय कोकाटेंनी भाजपला इशारा दिला आहे. भाजपाच्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती आहे की, आपण सर्व पाहिले आहेत. जर एकनाथ शिंदे हे बरोबर नसतील तर काय होईल, याचा विचार आपण करा. आपल्या वर्तनामध्ये सुधारणा करा. आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्हाला गोडीत समजून घ्या, आमचीही चार कामे करा. हवेत उडण्याचे कमी करा, असा सल्ला देत आपण एकटेच सत्तेत आहोत, हे विसराल ही अपेक्षा व्यक्त करत इशारा ही दिला.
हेही वाचा :
- Pravin Darekar on Ajit Pawar: अजित पवारांना डावलण्याचे षड्यंत्र सुरू, त्यांनी लवकर निर्णय घ्यावा- प्रवीण दरेकर
- Amit Shah Security Lapse: नांदेडहून तामिळनाडुला पोहोचताच अमित शाह यांच्या सुरक्षेत त्रुटी, नेमके काय घडले?
- Sanjay Raut on Amit Shah: कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून अमित शाह यांचे फक्त निवडणुकांवर लक्ष-संजय राऊत