सोलापूर - बहुचर्चीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार हे डमी अर्ज भरणार आहेत. धक्कातंत्राचा अंवलब करण्यात माहीर असलेले पवार डमी अर्ज भरणार असल्याची कुणकुण लागताच भाजपनेदेखील सावध पवित्रा घेतलायं. डमी अर्ज भरणाऱ्या पवारांनी उमेदवारी कायम ठेवली तर ऐनवेळी पंचायत नको म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुखांनाही अर्ज भरण्याचे आदेश प्रदेश भाजपने दिले आहेत. त्यामुळे माढ्यात सुरू असलेल्या कडी-कुरघोडीच्या राजकारणात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
माढ्यातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. ते आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र, याचवेळी शिंदे यांच्यासोबत स्वतः शरद पवार आपला डमी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने भाजपच्या गोटात कल्लोळ माजला आहे. संजय शिंदे उमेदवार गृहीत धरून भाजपने फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा १ तारखेला उमेदवारी अर्ज भरला. पण पवारांचा डमी अर्ज दाखल होणार असल्याची खबर मिळताच भाजपने आपल्या हालचाली वाढवल्या आणि सुभाष देशमुख यांना मैदानात उतरवायचे ठरवले आहे. याबाबत विचारल्यावर खुद्द देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आपला अर्ज भरणार असल्याचे सांगितले. पण पवारांचा संदर्भ येताच ठरवू, असे सुचक उत्तर देशमुखांनी दिलयं.
माढ्यात संजय शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने शरद पवार आज सोलापूरात येत आहेत.ते आपला डमी उमेदवारी अर्ज भरतात का? तेच निवडणूक रिंगणात उतरतात याची उत्सुकता राजकीय जाणकारांना लागलीय.