सोलापूर: मोहोळ नगरपरिषदेसमोर शनिवारी दुपारी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहोळ तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली हे अनोखे आंदोलन झाले. संभाजी भिडेंच्या पुतळ्याला उलटे टांगून निषेध केल्याने सोलापूर जिल्हाभरात आंदोलनाची एकच चर्चा सुरू आहे. रमेश बारसकर यांनी संभाजी भिडें यांनी आजपर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची आठवण करून दिली. शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्यामागे कोण आहे? याचा देखील शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
संविधानाने जगण्याचा अधिकार दिला: मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते रमेश बारसकर यांनी मोहोळ नगरपरिषदे समोर भाषण करत संभाजी भिडेंचा निषेध केला. यावेळी बारसकर यांनी बोलताना अनेक किस्से सांगितले. किती झोपड्या जाळल्या हा प्रश्न महत्त्वाचा नाही तर, वेड्याच्या हातात काडीपेटी कोणी दिली हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तशी परिस्थिती संभाजी भिडेंबाबत निर्माण झाली आहे. संविधानाने प्रत्येक भारतीय व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला आहे; पण काही लोक या संविधानाला मानत नाहीत. संभाजी भिडेंनी यापूर्वी देखील 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांनी आंबा खावे, मुलगा होईल असे अंधश्रद्धेचे वक्तव्य केले होते. या सर्व वक्तव्यांचा निषेध करत संभाजी भिडेंचा पुतळा उलट टांगून निषेध करण्यात आला.
पुतळ्याला टांगला उलटा: शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी महात्मा गांधी बाबत केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध केला जात आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाने शनिवारी दुपारी अनोखे आंदोलन केले आहे. संभाजी भिडे यांचा भव्य पुतळा तयार करून आणण्यात आला. यानंतर मोहोळ नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भिडेंच्या पुतळ्याला उलटे टांगून आम्ही खरंच खाली मुंडी वर पाय केले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. राष्ट्रवादीच्या या अनोख्या आंदोलनाची सोलापूर जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
तर राज्यभर आंदोलन करू: संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही. अमरावती पोलीस व गुप्तचर यंत्रणा का गप्प आहे, असा आरोप काँग्रेसचे नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.
हेही वाचा: