बार्शी (सोलापूर) - वाढत्या रुग्णसंख्येमुळे केवळ अत्यावश्यक सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाच्या निर्देशांचे उल्लंघन केले म्हणून येथील हळद गल्लीतील चांदमल ज्वेलर्सवर कारवाई करत हे दुकान तीस दिवसांसाठी सील केले. तर सराफ दुकानदार अमृतलाल चांदमल गुगळे यांच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरिगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना हळद गल्लीतील चांदमल ज्वेलर्स हे दुकान उघडे होते. कोव्हीड १९ विषाणूचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती करून शासनाचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चांदमल ज्वेलर्स दुकान तीस दिवसांकरीता सील करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रत्येकाने नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.