सोलापूर- कोविड आणि नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि सर्व डॉक्टर, कर्मचारी सज्ज आहेत. कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ देणार नाही, असे् वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचनेनुसार योग्य कार्यवाही सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अडीच ते तीन महिन्यापूर्वी कोविड वॉर्ड तयार केलेला आहे. त्यामध्ये 115 बेडची सोय आहे. त्यामध्ये 15 बेड आयसीयुचे होते, त्याची क्षमता 50 पर्यंत वाढवली आहे. बेड अपुरे पडत असतील तर त्यासंदर्भात डॅशबोर्ड तयार केला आहे. कोणत्याही पेशंटला दाखल करून घेण्यासाठी दिरंगाई होऊ देणार नाही, असे डॉ.संजीव ठाकूर म्हणाले.
जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार खासगी दवाखान्यांचीही मदत घेणे सुरू आहे. काही रुग्णांना खासगी दवाखान्यात दाखल केले जातेय. त्यामुळे रुग्णांवर अतिशय व्यवस्थितरित्या उपचार सुरू आहेत. सोलापूरकरांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरुन जाऊ नये. स्वत:ची काळजी घ्यावी. आम्ही तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज आहोत, असेही ठाकूर यांनी सांगितले.