सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसने मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्री पदा पर्यंतची सर्व पदे देऊन देखील त्यांनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरच मी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली, असे स्पष्टीकरण माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बागल गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलासराव घुमरे, सुनील सावंत, चिंतामणी जगताप, अल्ताफ तांबोळी, कन्हैयालाल देवी, आदींची भाषणे झाली.
यावेळी बोलताना संजय शिंदे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत होतो. तेव्हा माझ्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. मला उमेदवारी दिली नाही. यावेळी दोन्ही पक्ष मला उमेदवारी घ्या म्हणत होते. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून कोठेही गेलो नव्हतो. विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्याच उमेदवाराचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी रश्मी बागल म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्याची ताकद कोणात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव राष्ट्रवादीच करू शकते. त्यामुळे आपापसांत मतभेद होणार नाही, याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आपल्यात मतभेद करण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम सर्वांना करायचे असल्याचेही बागल यांनी यावेळी सांगितले.