सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार संजय शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेतली आहे. संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करावे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
संजय शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याअगोदर ते भाजपसोबत होते. भाजपच्या सोबतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही मिळवले होते. करमाळा विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच मागील ४ वर्षापासून त्यांची वाटचाल सुरू होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. भाजपसोबत असलेल्या संजय शिंदे यांनी ऐनवेळी भाजपला नकार देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविली. त्यामुळे राजकीय गणित बिघडले.
लोकसभा निवडणूक लढवत असताना राष्ट्रवादी पक्षाच्या रश्मी बागल या करमाळ्यातून विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या दावेदार आहेत. असे असले तरीही संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी, या मागणीसाठी शिंदे यांच्या समर्थकांची गुरुवारी करमाळा शहरामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले नाही तर, त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून करमाळा विधानसभेसाठी प्रमुख दावेदार असलेल्या बागल गटाव्यतिरिक्त संजय शिंदे यांना उभे राहण्याचे कार्यकर्त्यांनी आग्रह केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात करमाळा तालुक्यातील राजकारणामध्ये तीव्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे.