सांगोला (सोलापूर) - कोळा येथे वाळूमाफियांनी कोळा मंडळचे मंडळाधिकारी ए. जी. जाधव आणि इतर तीन सहकारी तलाठ्यांना बेदम मारहाण केेल्याची घटना घडली. याच्या निषेधार्थ सांगोला तालुका तलाठी संघआणि महसूल कर्मचारी संघाच्या वतीने सहा जूनपासून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. याची माहिती सांगोला तलाठी संघाचे अध्यक्ष विनोद भडंगे आणि सचिव कुमाररवी राजवाडे यांनी दिली.
पाच जून 2020 च्या रात्री तहसीलदार योगेश खरमाटे यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिलेल्या सूचनेनुसार मंडळ अधिकारी एन. जी. जाधव, कोळ्याचे तलाठी एच. एम. काटकर, बुद्धेहाळचे तलाठी ए. बी. नवले आणि इतर सहकारी तलाठी यांचे पथक कोळा येथे अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेले होते. आलदर वाडी येथे बोलेरो आणि इनोव्हा गाडीतून आलेल्या उमेश कोळेकर (रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ), अल्ताफ आत्तार (रा. कोळा, ता. सांगोला), कृष्णा हरीबा गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला), शिवाजी कोळेकर आणि अक्षय (पूर्ण नाव नाही) यांच्यासह इतर पंधरा ते वीस वाळूमाफियांनी मंडळ अधिकारी जाधव, तलाठी काटकर, नवले त्यांच्यासह इतर तलाठ्यांना वाटेत अडवून लाठी-काठी, लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मंडळाधिकारी जाधव, तलाठी काटकर, नवले हे जबर जखमी झाले. तसेच, नवले यांच्याजवळील एक अँड्रॉइड मोबाईल, काटकर यांच्याजवळील पैशाचे पाकीट आणि एटीएम कार्ड जबरदस्तीने लुबाडून नेले. याची तक्रार जाधव यांनी सांगोला पोलीस ठाण्याला दिली आहे.
गौणखनिज या विषयासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नेमून दिलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी ग्रामस्तरीय समिती किंवा पोलीस बंदोबस्त व नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी देत नाही, तोपर्यंत सांगोला तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तसेच महसूल कर्मचारी संघटना, सांगोला लिपिक अव्वल कारकून संवर्ग हे सर्व आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज (कोरोनाविषयी कामकाज) वगळून इतर सर्व महसूली कामकाजावर बहिष्कार करून काम बंद आंदोलन करीत असल्याची माहिती सांगोला तलाठी संघाच्या पदाधिकारी यांनी दिली आहे. तसेच, मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तलाठी आणि महसूल संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
या आरोपींना अटक व कारवाई न झाल्याने, काम बंद आंदोलनामुळे जनतेच्या होणार्या गैरसोयीबद्दल पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन जबाबदार राहतील, असा इशाराही तलाठी संघ आणि महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने दिला आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर, महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक सोलापूर, उपविभागीय अधिकारी मंगळवेढा, तहसीलदार सांगोला, पोलीस उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांना संघटनेच्या वतीने दिले आहे.