सांगोला (सोलापूर)- सांगोला शहरातील दुकाने उघडण्याचा नियम बदलण्यात आला आहे. केवळ पूर्व व पश्चिम पद्धतीने दुकाने उघडण्याऐवजी दोन्ही बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी राहणार आहे. ही माहिती सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगोला नगरपरिषदेने दुकानेे उघडण्याचे सुधारित आदेश काढले आहेत.
हे आहेत महत्त्वाचे बदल
(1) आतापर्यंत परवानगी असणारी दुकाने व आस्थापना यापुढेही सुरू ठेवता येणार आहेत.
(2) सर्व प्रकारची ब्युटी पार्लर व सलून दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.
(3) पूर्व-पश्चिम पद्धत बदलून आता दोन्ही बाजूची दुकाने उघडण्यास परवानगी आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, की सर्वांनी आजपर्यंत जबाबदारीने वागून सांगोला शहराला कोरोना संसर्गापासून दूर ठेवले आहे. यापुढेही अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने एक जूनपासून टाळेबंदीचे अनेक नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक ठिकाणी विविध उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास मुभा आहे.