पंढरपूर - विवाहित महिलेस तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून गळ्यात हार घालायला लावून लग्न झाले आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली. महमदाबाद येथील ३० वर्षीय महिलेस बळजबरीने जीपमध्ये घालून पळवून नेऊन लग्न झाल्याचे भासवले. ही घटना २१ ऑगस्टला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजरगाव येथील कपिल देशमुख, अजित देशमुख, सतीश व इतर एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार व तिचा पती हे घरासमोरील अंगणात झोपले होते. पीडित महिलेच्या ओळखीचे कपिल देशमुख त्यांच्या साथीदारांसह पांढऱ्या रंगाची जीप घेऊन तिथे आले. त्यांनी पीडितेला बळजबरीने हाताला धरून जीपमध्ये घातले. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजरगाव येथील एका मंदिरात नेले. तिथे कपिल देशमुख याच्या गळ्यात हार घालायला लावून तिचे त्याच्याशी लग्न झाले आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
कपिल देशमुख याने तूच माझी बायको आहे, मी तुला सोडणार नाही, तू कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरातील लोकांना माझ्या गाडीत असलेल्या तलवारी, कुऱ्हाडीने मारून टाकू, अशी धमकी दिली. पोलिसांनी संशयितांवर अपहरण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक फौजदार संजय राऊत अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - चिंताजनक : एकाच दिवशी विवाहिता बेपत्ता, तर दोन अल्पवयीन मुली गेल्या पळून
हेही वाचा - विशेष : लॉकडाऊननंतर टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा; फास्टॅगकडे वाहनधारकांची पाठ